भिगवण वार्ताहर.दि. १९
भिगवण येथे १५ व्या वित्त आयोगातील मंजूर रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरीच हमरीतुमरी झाल्याची घटना घडली.तर यावेळी विरोधकांनी विकासकामे अडवून सदस्यांना शिवीगाळ केल्याची माहिती सत्ताधारी पार्टीच्या सदस्य प्रतिनिधी तुषार क्षीरसागर यांनी दिली .तर स्थानिक नागरिकाच्या मागणीनुसार रुंदी वाढविण्याची मागणी केली यात वादविवाद करण्याचे कारणच नसल्याचे राष्ट्रवादीचे सचिन बोगावत यांनी सांगितले.
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जात असलेल्या भिगवण मध्ये मागील काही दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादी पुरस्कृत पार्टीचा पराजय करीत सत्तेत आलेल्या भाजपा पुरस्कृत पार्टी मागील काळात निधी मिळत नसल्यामुळे भिगवण गावातील विकास कामात सातत्य न राखता आल्याचे बोलले जाते.तर भिगवण गावच्या विकासासाठी राज्यमंत्री भरणे यांनी विकासनिधी देवूनही त्याचे श्रेय लाटले जात असल्याचे राष्ट्रवादीच्या बाजूने सांगितले जात आहे. भिगवण ग्रामपंचायत १५ व्या वित्त आयोगात मंजूर झालेल्या ३ मीटर रुंद ९५ मीटर लांबीच्या रस्त्याच्या कामाला रविवारी सुरवात करण्यात आली होती.मात्र यावेळी माजी सरपंच संतोष धवडे यांनी रस्त्याची रुंदी ४ मीटर करण्याची मागणी केली. तसेच स्थानिक नागरिकांची मागणी असताना ३ मीटर रुंदीचा रस्ता करण्यास विरोध दर्शविला .यावेळी सत्ताधारी सदस्य आणि विरोधक यांच्यात काही काळ बाचाबाची झाली. राष्ट्रवादीच्या सचिन बोगावत ,संतोष धवडे यांची तुषार क्षीरसागर यांच्या सोबत अगदी शिवीगाळ पासून अंगावर धावून जाण्यापर्यंत वादावादी झाली.यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमली होती.मात्र याविषयी भिगवण पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सरपंच तानाजी वायसे : भिगवण गावच्या नागरिकांनी विरोधकांना सत्तेतून घरी बसविले असल्यामुळे विकास कामात अडथळा आणण्याचे काम केले जात आहे.तर भिगवण शहरात होणारी विकासकामे नियमाचे पालन करून आणि अत्यंत पारदर्शकपणे केली जात आहेत.सदर रस्ता ३ मीटर रुंदीचा असून शिल्लक जागेतून पिण्याची पाईपलाईन आणि ड्रेनेज व्यवस्था केली जाणार असल्याचे सांगितले.
माजी सरपंच महेश शेंडगे : सत्ताधारी ग्रामपंचायत पदाधिकारी सत्तेचा दुरुपयोग करून अनियमित विकासकामे करीत आहेत.तर माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांनी विकास कामासाठी निधी देवूनही श्रेयवाद घेण्याचे चुकीचे काम केले जात आहे.तर आम्ही सत्तेत असताना सर्व रस्ते ४ मीटर केले असताना आता त्याठिकाणी ३ मीटरचा हट्ट कशासाठी धरला जात आहे याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच आहे.
आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर भिगवण मधील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील वातावरण अजून तापणार असल्याचे दिसून येत आहे.माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या रोज चाललेल्या शाब्दिक युद्धामुळे याला अजून वारा मिळत आहे. मात्र भिगवण गावच्या इतिहासात राजकारणावरून तुफानी कधीच घडलेली नसल्यामुळे पुढेही भिगवण गावचे वातावरण स्वच्छ राहावे हि ग्रामस्थांची मागणी आहे.