भिगवण वार्ताहर.दि.१०
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण परिसरात सकुंडेवस्ती येथे मेंटेनन्सच्या कंत्राटी कामात असणाऱ्या महिलेचा अज्ञात दुचाकीस्वार धडकून झालेल्या अपघातात हि महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेची जबाबदारी हायवे प्रशासन आणि सबंधित कंत्राटदार घेताना दिसून येत नसल्यामुळे दवाखान्याचा खर्च भागवायचा कसा असा सवाल कुटुंबापुढे निर्माण झालेला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि पुणे सोलापूर महामार्गावर रोडची स्वच्छता तसेच डिव्हायडरवर लावलेल्या झाडांची निगा ठेवण्याचे काम हायवे आणि टोल प्रशासन कंत्राटी पद्धतीने देत असतात.याच कामावर असणाऱ्या एका महिलेचा सकुंडेवस्ती येथे ४ दिवसापूर्वी अज्ञात दुचाकीस्वार धडकून अपघात झाला.या अपघातात महिलेच्या पायाचे हाड २ ठिकाणी मोडले.तर छातीच्या ४ बरगड्या मोडल्या.अपघात घडताच या महिलेला बारामती येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या महिलेचा उपचार सुरु असून दवाखान्याचे बिल २ लाख च्या पुढे असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. रोज काम करून खाणारे कुटुंब असून त्यांच्याकडे इतकी रक्कम जमविणे शक्य नाही.मात्र रस्त्यावर काम करत असताना अपघात झाला असल्यामुळे याची जबाबदारी हायवे आणि टोल प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.तसेच यात ज्यांनी कंत्राट घेतले आहे त्यांनी कामावरील माणसाच्या जीविताची योग्य प्रकारे काळजी घेणे गरजेचे असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे.त्यामुळे बिला अभावी महिला मृत्युच्या दारात सोडणे योग्य नाही.
याबाबत मेंटेनन्स विभागाच्या सुरजित सिंग यांच्याशी संपर्क साधला असता यात नक्की खर्च कोणी करायचा आणि कामावरील लोकांच्या जीविताची जबाबदारी कोणाची याचीच माहिती त्यांना नव्हती त्यामुळे त्यांनी काही न बोलता फोन स्वीच ऑफ केला.
याबाबत सबंधित कंत्राटदार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल घेतला नाही. त्यामुळे कंत्राट घेताना कामगाराच्या जीवितेची जबाबदारी कोणाची आणि त्यांचा आयुर्विमा कोण उतरवणार याची माहिती अनुत्तरीत राहिली.
चौकट : पुणे सोलापूर महामार्गावर वाहतूक सुरु असताना अनेक कामगार काम करीत असतात .त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी हायवे प्रशासन घेत नसल्याचे दिसून येते.तर अपघात झाल्यावर त्यांना असे वाऱ्यावर सोडून दिले जाते.मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी गोरगरीब महिला पुरुषांना काम मिळत नसल्यामुळे याकडे ते दुर्लक्ष करून कामावर येतात आणि यात त्यांना नाडले जाते.