भिगवण वार्ताहर .दि.७
कुंभारगांव(ता.इंदापुर) येथील ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा बनावट शिक्का बनवुन त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामसेवकांच्या सजगतेमुळे उघड झाला आहे. याबाबत कुंभारगांव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये सही व शिक्याचा गैरवापर झाल्याचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.
याबाबत कुंभारगावचे ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मिळालेली माहिती अशी की, संजय शिवाजी मोरे यांचा कुंभारगांव ग्रामपंचायतीकडे आर.सी.सी. बांधकाम नोंद करण्यासाठी अर्ज आला होता. कुंभारगांव ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये सदर अर्ज मंजुरही करण्यात आला होता. श्री. मोरे यांनी बारामती येथील शुभंम फायनान्स कंपनी यांचेकडे मिळकत क्र. ८२ चा दि. २२ जुन या तारखेचा उतारा सादर केला होता. फाय़नान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला उताऱ्याबाबत शंका आल्यामुळे सादर केलेला उतारा त्यांनी ग्रामसेवक श्री. बोरावके यांचे व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठविला. उतारा पाहिल्यानंतर उताऱ्यावरील सही व शिक्के बनावट असल्याचे ग्रामसेवक बोरावके यांचे लक्षात आले. याबाबत श्री. बोरावके यांनी येथील भिगवण पोलिस ठाण्यात ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के व सहया करण्यात आल्याची तक्रार केली असुन याची चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
सरपंच उज्वला परदेशी : ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के तयार करणे व बनावट सह्या करणे हे प्रकरण गंभीर आहे. यामधुन बॅंका, पतसंस्था यासारख्या आर्थिक संस्थाची फसवणुक झाली असण्याची शक्यता आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने पावले उचलुन कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.तसेच याबाबत कोणाकडे काही माहिती असल्यास त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क साधणे आवश्यक असल्याचे सांगितले .