रस्ता बटराप्रमाणे फुगणार कि कोंबडीच्या कातडे सारखं सोलटवून डांबर निघणार हे काळच ठरवणार
भिगवण वार्ताहर.दि.३
कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून हि याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे कंत्राटदारावर एवढी मेहेरबानी का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. तर राज्यमंत्री भरणे यांनी आणलेला निधी हा सर्वसामान्य नागरिकांच्या रस्त्यासाठी कि कंत्राटदार यांचे खिशे भरण्यासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.
कुंभारगाव पोंधवडी पिंपळे या ग्रामीण मार्गासाठी अंदाजे ९ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.तर याचे काम व्ही .एच खत्री या बारामतीच्या कंत्राटदाराला मिळाले आहे.यातील पहिला टप्पा पुणे सोलापूर महामार्ग ते पोंधवडी असे काम सुरु करण्यात आलेले आहे.परंतु हे काम इस्टीमेंट प्रमाणे होत नसल्याचे प्रत्यक्ष दिसून येत आहे.याठिकाणी कंत्राटदार जुन्या रस्त्याच्या दोन बाजूनी एक ते दीड फुटाची चारी खणून त्यात खडी भरत असल्याचे दिसून येत आहे. तर खणलेली चारी मुरुमापर्यंत सुधा नेली जात नाही.त्यामुळे रस्ता तयार होताच आठ दिवसात दोन्ही बाजूने रस्ता खचणार हे निश्चित. आणि रस्त्याचे काम मजबूत होण्यासाठी बॉक्स करून रोलिंग पाणी करणे आवश्यक असताना हि लाव लीजाव पद्धत का असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत. तर कंत्राटदार रस्त्याचे काम घाईघाईने करीत ते पूर्ण करीत असल्याचेही दिसून येत आहे.या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी भेट देवून कामाची प्रतवारी तपासणे गरजेचे आहे.
राज्यमंत्री दतात्रय भरणे कोटीच्या कोटी निधी इंदापूर तालुक्यातील रस्त्यासाठी मंजूर करून आणत आहेत मात्र या निधीचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का यावर लक्ष ठेवणे स्थानिक कार्यकर्त्यांचे काम आहे .मात्र स्थानिक कार्यकर्ते आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत नाही. त्यामुळे कंत्राटदार यांचे फावत असून तक्रारी करणाऱ्याला चिरीमिरी देवून गप्प केले जात आहे.त्यामुळे कोट्यावधी निधी वापरून तयार होणारे कुचकामी ठरणार आहेत.
याबाबत कंत्राटदार व्ही.एच खत्री यांच्या वर्क मॅनेजर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काम हे एस्टिमेट प्रमाणे सुरु असल्याचे सांगितले.तर एस्टिमेट पहावयास मिळेल का असे विचारले असता ते तुम्हाला सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात मिळेल असे सांगितले. तर कामाची माहिती फलकाबद्दल विचारला असता आम्ही लावला होता मात्र पडून गेला असेल असे सांगितले. काम सुरु होवून आठ दिवसात फलक पडत असेल तर रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न निर्माण होतो.
याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे डेप्युटी इंजिनिअर मनोहर सुर्वे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी याबाबत माहिती मिळाली असल्याचे सांगितले.तसेच याकामाची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले.आणि सदर काम इस्टीमेंट प्रमाणे करून घेतले जाणार असल्याचे सांगितले.
सदर रस्ता बारामतीतील नामांकित कंत्राटदार करत असून याच कंत्राटदाराने निरगुडे लाकडी निंबोडी भवानीनगर हा रस्ता तयार केला होता .या रस्त्याबाबत मोठा गाजावाजाही निर्माण झाला होता .बटरा प्रमाणे प्रमाणे फुगलेला रस्ता ,कोंबडीचे कातडे सोललया प्रमाणे निघणारा डांबराचा थर अशी अनेक विश्लेषणे बातमीदारांनी या रस्त्यासाठी वापरण्यात आली होती .आता कुंभारगाव पोंधवडी पिंपळे हा रस्ता सुद्धा त्याच पध्दतीने बनवल्या जात आहे त्यामुळे या रस्त्याला नक्की कोणती विश्लेषण लावली जाणार हे काळच ठरवेल .