भिगवण वार्ताहर .दि.२१
कुंभारगाव येथील जागृत देवी अशी ओळख असणाऱ्या लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासून सुरु होणार असल्याची माहिती सरपंच उज्वला परदेशी यांनी दिली. दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेला परिसरातील नागरिक तसेच पुणे आणि मुंबई भागात राहणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात.
उजनी धरणाच्या किनारी वसलेल्या आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कुंभारगाव येथे लक्ष्मी मातेचे हे पुरातन काळातील मंदिर आहे.सालाबाद प्रमाणे या देवीचा यात्रा उत्सव पार पडत असून यात्रेच्या पहिल्या दिवशी रात्रीच्या १२ वाजता गावातील प्रत्येक घरातील पुरुष मंडळीने देवीला पाणी घालण्याची पुरातन काळा पासून परंपरा आहे.सकाळी नैवद्य झाल्यानंतर दुपारी देवीला चोळी पातळ विधी पार पाडला जातो.रात्री देवीचा छबिना काढून पहाटेच्या सुमारास पालखी मंदिरात पोहोचवली जाते.पालखी मंदिरात पोहोचविल्या नंतर भाविकांच्या मनोरंजनासाठी जळगावकर यांचा तमाशा कार्यक्रम करण्यात येईल .दुसर्या दिवशी मल्लांच्या कुस्त्या आयोजन करण्यात येते.देवीच्या पालखीचा मान गेली ४०० वर्षापासून गावातील भोई समाजाकडे मिळालेला असल्याचे वयस्कर मंडळी सांगतात. गेली २ वर्ष कोरोना महामारीमुळे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती .त्यामुळे मोठ्या प्रमाणात भक्त यात्रेला हजर राहणार असल्याचा अंदाज ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. ग्रामपंचायत विभागाकडून गावात स्वच्छता पाणीपुरवठा आणि दिवाबत्ती करण्यात आली असल्याची माहिती सदस्या दिपाली राहुल भोई यांनी दिली.