भिगवण वार्ताहर .दि.२५
प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८ हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यभरात प्लास्टिकचा भस्मासुर वाढत असताना त्याचे दुष्परिणाम हि दिसून येत आहेत.पर्यावरण आणि जनावरासाठी हे प्लास्टिक धोक्याचे ठरत आहे.त्यामुळे राज्यसरकारने प्लास्टिक बंदीसाठी कायदा केला आहे.मात्र कायदा करूनही त्याची अमलबजावणी केली जात नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर या घातकी प्लास्टिकचा वापर करीत आहेत.नव्यानेच सत्तेवर आलेल्या भिगवण कार्यकारीनीने स्वच्छ भिगवण सुंदर भिगवण करण्यासाठी प्लास्टिक बंदीसाठी काही दिवस जनजागृती केली.यात इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,बाळासाहेब भोसले आणि कपिल भाकरे यांनी पुढाकार घेत दंडापेक्षा नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत कामगार आणि ग्रामसेवक यांना सोबत घेत फेरीचे आयोजन केले होते.मात्र तरीही काही दुकानदार यात वापर करीत असल्याचे दिसून आल्याने शेवटी पोलीस विभागाची आणि महसूल विभागाची मदत घेत दंडाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ९ दुकानदार ,हॉटेल व्यावसायिक आणि भाजी विक्रेते यांच्या कडून १८ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.सदरील कारवाई ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी ,पोलीस विष्णू केमदारने ,प्रमोद गलांडे आणि ग्रामपंचायत कामगार यांच्या वतीने करण्यात आली.