भिगवण वार्ताहर.दि.१९
पुणे सोलापूर महामार्गावरील गागरगावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे टायर बदलत असताना खासगी प्रवाशी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात आदित्य विश्वास देवकाते या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.तर या अपघातात कर्मयोगी साखर कारखान्याचे नूतन संचालक विश्वास देवकाते गंभीर जखमी झाले आहेत.
कर्मयोगी साखर कारखान्याचा ऊस वाहतून करत असताना सदर अपघात झाला.उसाने भरलेल्या ट्रोलीचा टायर पंक्चर झाल्याने मदनवाडी येथे राहणारे कारखाना संचालक विश्वास देवकाते आणि त्यांचा मुलगा आदित्य हे रात्रीचे वेळी आपली इनोव्हा गाडीतून टायर बदलण्यासाठी ड्रायव्हरच्या मदतीला गेले होते.या वेळी टायर बदलत असताना खासगी प्रवासी बसने ट्रोलीला धडक दिली.यावेळी ड्रायव्हरला बॅटरीचा उजेड दाखवीत शेजारी उभा असणाऱ्या आदित्यच्या छातीवर आणि बरगडीवर ट्रोलीचा दणका बसला . तर विश्वास देवकाते यांनाहि मार लागला.तर ट्रोली खाली काम करीत असणाऱ्या ड्रायव्हर सोनू पवार यांना पायाला गंभीर दुखापत झाली.उपचारादरम्यान आदित्य याचा मृत्यू झाला.तर जखमींवर भिगवण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.आदित्य हा माजी संचालक रंगनाथ देवकाते यांचा नातू तर नवनिर्वाचित संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा होता .तर त्याच्या अपघाती मृत्यूमुळे मदनवाडी गावांवर आणि भिगवण परिसरावर शोककळा पसरली आहे .