अतिक्रमणाचा महामेरू रोखणार कोण ? प्रशासनातील विभाग करताहेत टोलवाटोलवी

0
590

भिगवण वार्ताहर .दि.२८

भिगवण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमणाचा महामेरू वाढत असताना प्रशासन मात्र आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्यामुळे अतिक्रमणाचा विषयाला खतपाणी मिळत असल्याचे दिसून येत आहे.आज ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत याची जाणीव प्रकर्षाने होत होती  .

भिगवण गावांतील अनेक महाराष्ट्र शासनाच्या जागा आणि शैक्षणिक उद्देशासाठी राखीव जागेवर अतिक्रमण होत आहे. ग्रामपंचायतीने सदर जागा महाराष्ट्र शासनाच्या नावे असल्यामुळे महसुल व पुनर्वसन विभागाला अतिक्रमणाबाबत सांगूनही हा विभाग अतिक्रमणावर ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाई करण्यासाठी सूचित करत असल्यामुळे यात काही राजकीय हस्तक्षेप आहे काय ? अशी संशयाची सुई उभी राहत आहे . शासनाच्याच विविध विभागांमार्फत अतिक्रमण वाढत असताना काढण्याच्या जबाबदारीवरुन सुरु असलेल्या टोलवाटोलवीबद्दल सामान्य नागरिकांमधुन नाराजी व्यक्त होत आहे.राज्यात सुरू असणारी राजकिय परिस्थिती भिगवण मध्ये पाहण्यास मिळत असून सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीला ज्याप्रमाणे भाजप अडचणीत आणताना पहावयास मिळतो तसाच भिगवण मध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपला कुराघोडी चा सामना करावा लागत असल्याचे या अतिक्रमण कारवाईत दिसून येत आहे .त्यामुळे अतिक्रमण करणारांची पोळी आपसुकच भाजत असून त्यामुळे सार्वजनिक जागांसह रस्त्यावरही अतिक्रमणे वाढली आहे.

येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये शैक्षणिक उद्देशासाठी राखीव जागेवर अतिक्रमण होत आहे. अतिक्रमणामुळे त्या ठिकाणी असलेली मंदिरे, ज्ञानमंदिरे व समाजमंदिरे येथे जाण्यासाठीही नागरिक व विदयार्थ्यांना रस्ता शिल्लक नाही अशी स्थिती आहे. येथे अतिक्रमण होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर ग्रामपंचायतीने सबंधितास नोटीस देऊन व याबाबत महसुल व पुनर्वसन विभागास पत्रव्यवहार करुन सदर अतिक्रणावर कारवाई करावी असे सुचित केले होते. परंतु सदर जागा ही ग्रामपंचायतीकडे देखभालीसाठी असल्यामुळे अतिक्रमण काढण्यासाठी सर्व प्रशासकीय बाबींची पुर्तता करुन ग्रामपंचायतीने पुढाकार घ्यावा प्रशासन त्यास सहकार्य करेल अशी भुमिका प्रशासनाने घेतली आहे. ग्रामपंचायतीने अतिक्रमणावर कारवाईसाठी पोलिस प्रशासनाकडे बंदोबस्त मागितला असता नेमका त्याच वेळेस पोलिस प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे पोलिस प्रशासनाने मनुष्यबळ पुरविण्यास असमर्थता दर्शविली आहे. हे सर्व सामान्य नागरिकांच्या आणि सुजाण ग्रामस्थांच्या लक्षात येत आहे .  शाळा, महाविदयालय, मंदिर व समाज मंदिर परिसरामध्ये होत असलेल्या अतिक्रमणामुळे या ठिकाणी ये-जा करणे अडचणीचे ठरत आहे.  शासनाच्या विविध विभागाकडुन करण्यात येत असलेली टोलवाटोलवी व दिरंगाई पाहुन अतिक्रमणाच्या पाठीमागे मोठा राजाश्रम तर नाही ना अशी शंका सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

महसुल, पुनर्वसन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी समन्वय साधुन ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.राजकीय डावपेच होत असताना गावाचे गावपण जपलं जावं आणि निदान गावातील रस्त्याच्या होत असलेल्या अतिक्रमना वर कारवाई करण्यासाठी तरी महसूल विभाग ग्रामपंचायत प्रशासन एकत्र येतील आणि त्यांना पोलीस संरक्षण देतील अशी आशा सर्वसामान्य नागरिक करत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here