अवैध वाळू ,माती उपसा तसेच गौण खनिजांची चोरी थांबणार ? सर्वसामान्य नागरिकाची अपेक्षा
भिगवण वार्ताहर .दि.७
तहसिलदार श्रीकांत पाटील यांची तीन वर्षानंतर पुन्हा इंदापुरचे तहसिलदार म्हणुन बदली झाली आहे. ‘अवैध व्यावसायांवर प्रहार तर सर्वसामान्य माणसाचा आधार’ अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तहसिलदार श्रीकांत पाटील यांचे इंदापुरमध्ये सर्वच स्तरातुन स्वागत होत आहे. भिगवण तसेच इंदापूर तालुक्यामध्ये विविध ठिकाणी तरुण वर्गांने पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.
श्रीकांत पाटील यांची तीन वर्षापुर्वी इंदापुरहुन सोलापुर येथे बदली झाली होती. इंदापुर तालुक्यातील तहसिलदार पदाची कारकिर्द अतिशय वादळी ठरली होती. तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यामध्ये व तरुणाईला विधायक दिशकडे वळविण्यामध्ये त्यांनी महत्वपुर्ण भुमिका निभावली होती. त्यांच्या बदलीनंतर इंदापुर तालुक्यामध्ये बदली रद्द व्हावी यासाठी आंदोलनेही झाली होती.तर ग्राहक संघटनेचे तुषार झेंडे पाटील यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. तीन वर्षानंतर त्यांची पुन्हा इंदापुरचे तहसिलदार म्हणुन बदली झाल्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य वर्गातुन आनंद व्यक्त होत आहे तर अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. तालुक्यातील भिगवण, मदनवाडी, म्हसोबाचीवाडी, डिकसळ,डाळज आदी गावांमध्ये तरुणाईने तहसिलदार श्रीकांत पाटील यांचे बदलीचे स्वागत केले आहे. यावेळी अॅड. तुषार झेंडे पाटील, अवधुन जगताप, संदीप पाटील,सतीश सुबनावळ, दादा जगताप, रोटरी अध्यक्ष संपत बंडगर, बाळासाहेब सकुंडे आदींसह तरुणांनी ठिकठिकाणी पेढे वाटुन आनंद व्यक्त केला.
याबाबत बोलताना अॅड. तुषार झेंडे पाटील म्हणाले, तहसिलदार श्रीकांत पाटील यांची इंदापुर तालुक्यातील कारकिर्द ही सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देणारी होती. त्यांनी तालुक्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली होती. त्यांनी सर्वसामान्य व्यक्तींना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या इंदापुरातील बदलीचे तरुण वर्गातुन मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.
सत्यवार्ताच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील प्रशासनातील सर्व महत्वाच्या पदावर प्रभारी अधिकारी असल्यामुळे तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था तसेच आरोग्य सेवेला अडथळा येत असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती .याच बातमीचा परिणाम होत तालुक्यातील तहसीलदार पदी पाटील यांची पुनरनियुक्ती झाली असल्याचे दिसून येत आहे .
तहसीलदार पाटील यांच्या नियुक्ती मुळे तालुक्यातील अवैध वाळू आणि माती उपसा करणाऱ्या आणि राजकीय आशीर्वाद असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मुसक्या नक्कीच आवळल्या जातील असा विश्वास सर्व सामन्यात निर्माण झाला असल्याचे दिसून येते ,।