राज्यमंत्री ना .दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे केली मागणी .
कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचणार ……पांडुरंग जगताप (वकील)
भिगवण वार्ताहर .दि.३०
इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्याची आग्रही मागणी आता जोर धरू लागली असुन याबाबत नागरिकांनी गोविंद डी.कराड ( नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र राज्य) यांना तसेच राज्यमंत्री ना.दत्ता मामा भरणे यांना निवेदन देत मागणी केली आहे .
भिगवण हे पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील प्रमुख गाव आहे. परिसरातील ४० वाड्या वस्त्या आणि तीन तालुक्यातील अनेक गावातील दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे मानले जाते . इंदापुर पासुन ३५ किलोमीटर अंतरावर पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्ग वर हे शहर वसलेलं आहे . या परिसरातील लोकांना दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी च्या कामासाठी इंदापूर येथे जावे लागते .
अनेक राष्ट्रीयीकृत बँका ,सहकारी पतसंस्था आणि शालेय शिक्षणासाठी शाळा आणि कॉलेजचे या ठिकाणी जाळे पसरले आहे .तर बिल्ट कंपनी सारखा आशिया खंडातील सर्वात मोठा कागद प्रकल्पआणि राज्यातील मोठा मासळी बाजार भिगवण येथे असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल येथे होते .यामुळे परिसराला आर्थिक सुबता आहे पर्यायानी मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात. यासाठी नागरिकांना अत्यंत मौल्यवान वेळ व पैसा खर्च करून इंदापुर येथील कार्यालयात जावे लागते.भिगवण येथे कार्यालय मंजुर झाल्यास त्याचा फायदा भिगवण आणि परिसरातील नागरिकांना होणार आहे. तर यातून शासनाचा महसुल वाढण्यास मदत होणार आहे . याचाच विचार करून दुय्यम निबंधक कार्यालय मंजुरी देण्याची मागणी केली जात असल्याचे अॅड. पांडुरंग जगताप व सामाजिक कार्यकर्ते राहुल धांडे यांनी सांगितले .
जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, इंदापुर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव,शंकरराव गायकवाड ,राष्ट्रवादी पक्षाचे कोषाध्यक्ष सचिन बोगावत,प्रशांत शेलार,जयदीप जाधव,तुषार क्षिरसागर,कपिल भाकरे,सत्यवान भोसले यांनी ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे.