डाळज येथील कार अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू

0
387


भिगवण,ता.१० :
पु्ण्यामध्ये जुनी गाडी खरेदी करुन गावी लातुरला निघालेल्या दोघांचा मोटार कारचा टायर फुटून कार उलटुन झालेल्या अपघातांमध्ये मृत्यू झाला. पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. १(ता.इंदापुर) येथे हा भीषण अपघात झाला. अपघातामध्ये मोटार कारमधील दोघे जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात गुरुवारी(ता.१०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास झाला.
नंदकिशोर भाऊसाहेब जोगदंड, सौदागर दगडु उंप (वय.३५ रा.दोन्ही वासनगांव,ता.जि. लातुर)यांचा अपघातांमध्ये मृत्यू झाला तर चालक नवनाथ खंडु कांबळे (वय. २८ रा. वासनगांव,ता.जि. लातुर) हा अपघातांमध्ये गंभीर जखमी झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ःलातुर जिल्ह्यातील वासनगाव येथील दोघे चालकांसह पुणे येथे जुनी गाडी खरेदीसाठी आले होते. जुनी गाडी(क्र. एम.एच. १२ एफ.पी. ८२९०) खरेदी करुन ते गावी परतत असताना डाळज क्र.१(ता.इंदापुर) येथील उतारावर गाडीचा टायर फुटुन भीषण अपघात झाला. अपघातानंतर गाडीच्या अनेक पलटया झाल्यामुळे गाडीतील दोघांच्या डोक्याला व संपुर्ण शरीराला गंभीर जखमी होऊन ते जागीच ठार झाले तर चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर गाडीचा अक्षरशः चुराडा झाला होता. गाडीतील जखमी व मृतांना गाडीबाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोटार कारमध्ये अडलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला परंतु अपघातांमध्ये गाडीतील दोघे जागीच ठार झाले होते तर चालकांस गाडीतुन बाहेर काढण्यात आले. जखमीवर येथील खासगी रुग्नालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here