भिगवण वार्ताहर .दि.४
भिगवण येथील ढगफुटी सदृश पावसाने नुकसान झालेल्या भागाला तहसीलदार अनिल ठोंबरे यांनी भेट देत पाहणी केली.विठ्ठलराव थोरातनगर,शासकीय रो हाउस ट्रामा केअर तसेच आरोग्य अधिकारी निवास स्थान येथील नागरिकांशी बोलून घडलेल्या घटनेची माहिती घेतली. यावेळी भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव ,संजय देहाडे ,तुषार क्षीरसागर ,सचिन बोगावत ,बाळासाहेब भोसले तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य हजर होते.
भिगवण येथे बुधवारी झालेल्या ७१ मिलीमीटर पावसाने अनेकांचे यात नुकसान झाले.याची माहिती घेण्यासाठी तहसीलदार ठोंबरे आले असता या भागातील नागरिकांनी महामार्ग व आजूबाजूच्या १ किमी अंतरातून रस्त्याने सर्व पाणी हे बसस्थानक परिसरात जमुन तेथून ते ग्रामीण रुग्णालयाच्या आतील असणाऱ्या गटारीतून पुढे येत असते अशी माहिती दिली. याबाबीचे गांभीर्य ओळखून मा. तहसीलदार यांनी राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, सा.बां. उपविभागाचे अधिकारी व भिगवण ग्रामपंचायत चे सदस्य व पदाधिकारी तसेच या भागातील नागरिक यांची तातडीने बैठक आयोजित करून सर्व संबंधीत अधिकारी यांचेशी चर्चा केल्यानंतर व प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अस्तित्वातील राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावरील गटर या अनेक ठिकाणी गाळ व मातीमुळे बंद पडल्या आहेत सर्व बाजूने येणारा पाण्याचा प्रवाह अस्तित्वातील गटर मध्ये तो बसत नाही व तो ग्रामीण रुग्णालयाच्या कंपाऊंड खालून मार्ग काढत थोरातनगर मधील घरांमध्ये पाणी शिरते. तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस आसणारी गटरची रुंदी ही आतील गटारीपेक्षा दुपटीने कमी आहे असे निदर्शनास आले.
यावर प्रभावी उपाय करण्याच्या सूचना तहसीलदार ठोंबरे यांनी देत सा.बां उपविभाग भिगवण चे सहाययक अभियंता प्रशांत पंडित यांना ग्रामीण रुग्णालयापासून ते भिगवण सबस्टेशन पर्यंत चे मोठ्या आकाराचे गटरचे अंदाजपत्रक लवकरात लवकर तयार करण्यास सांगितले जेणेकरून पावसाळ्यात होणारा हा नेहमीचा त्रास कायमचा बंद होईल व परिसरातील नागरिकांचे होणारे नुकसान टाळता येईल.
या वेळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवन चे सहाय्यक अभियंता प्रशांत पंडित , शाखा अभियंता राजेंद्र चौधरी कनिष्ठ अभियंता अमोल कावडे भिगवण ग्रामपंचायत सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव ,तुषार क्षीरसागर इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,थोरात नगर संस्थापक बापूराव थोरात ,सचिन बोगावत बैठकीस हजर होते.