तातडीने सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्याची राज्य ग्राहक संघटना सदस्य तुषार झेंडे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे मागणी
भिगवण वार्ताहर.दि.१३
कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीच्या काळात इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून सक्षम अधिकाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी राज्य ग्राहक संघटनेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्याकडे केली.याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेल करून माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या काळात इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रभारी आहेत.तर या महा भयंकर साथीच्या आजाराच्या काळात आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अधिकारी असणारे तहसीलदारपद देखील प्रभारी आहेत.इंदापूर तालुक्याचे आरोग्य अधिकारी हे देखील प्रभारी आहेत.या तीनही पदावर सक्षम अधिकारी यांची नियुक्ती झालेली नाही .सध्या राज्यामध्ये आपत्कालीन परिस्थिती असताना आणि त्यातच कोरोना संसर्गाची दुसरी लाट चालू असताना इंदापूर तालुक्यामध्ये प्रशासन यंत्रणा राबविणारी ,कायदा सुव्यवस्था राखणारी तालुका कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार हे पद प्रभारी /अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अमलबजावणी कशी होवू शकते ? हा प्रश्न अनुउतरीत असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे.
तर सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या आरोग्य यंत्रणेच्या जीवावर तालुका लढतोय त्या आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी पद हि प्रभारीच आहे. त्यामुळे आपत्तीच्या काळात या तीनही पदावर सक्षम अधिकारी नियुक्ती करण्याची मागणी झेंडेपाटील यांनी मुख्य सचिव यांच्याकडे केली आहे .
इंदापूर तालुक्याचे आमदार हे महाराष्ट्रातील मंत्री मंडळात राज्यमंत्री आहेत त्यांच्याच तालुक्यात महत्वाची अधिकारी पदे प्रभारी असणे हे विशेष मानले जाते,तर विरोधक हि या प्रभारी पदाबाबत आवाज उठवीत नसल्यामुळे आपत्तीच्या काळात सर्वसामान्य जनतेला सुविधा मिळण्यावर मर्यादा येणार हे निश्चित..