भिगवण वार्ताहर.दि.१६
तक्रारवाडी गावातील बखळ प्लाट आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक मात्र पुनर्वसन विभागाची जबाबदारी असल्याचे सांगून डोळेझाक करत असल्याने अतिक्रमण करणार्यांना पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.तर ग्रामपंचायत कार्यालयात अतिक्रमण नोंदवही नसल्याची माहिती ग्रामसेवक यांनी दिली आहे.
तक्रारवाडी हे गाव उजनी धरणाच्या वेळी पुनर्वसित झालेलं गाव आहे.पुनर्वसन वेळी टेकडीच्या पूर्वेला वसणारे गाव गावातील तत्कालीन पुढार्या मुळे टेकडीच्या पश्चिमेला बारामती अहमदनगर राज्यमार्गाच्या कडेला वसविण्यात आले. भिगवण बाजारपेठ आणि राज्यमार्ग यामुळे या गावाच्या तीनही बाजूला कमालीचे अतिक्रमण करण्यात आले.राजकीय हस्तक्षेप आणि मलई खाणारे अधिकारी यांच्या मुळे अतिक्रमणाचा महामेरू वाढत गेला.गावाच्या दक्षिण बाजूला वनविभागाची जागा असताना सुद्धा अतिक्रमण वाढत गेले.गावातील काही पुढारी आणि हप्ते घेवून अतिक्रमणाला खतपाणी घालणारे वनविभागाचे कर्मचारी यांच्या वरदहस्ताने रात्रीच्या अंधारात दगड गोटे टाकून रात्रीच्या अंधारात बाहेरच्या बाजूला पडदे उभारीत वनविभागाच्या जागा अतिक्रमणाच्या घशात घातल्या गेल्या.
आता बाहेरच्या जागा संपुष्टात आल्याने अतिक्रमण करणार्यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आणि बखळ जागांवर आपले लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.मात्र यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणारी विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारिणी मात्र हातावर हात देवून याकडे बघत आहे.याबाबत ग्रामसेवक यांना गावातील नागरिकाने अर्ज केला असता ग्रामसेवकाने गावातील मोकळे प्लाट पुनर्वसन विभागाच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.आणि सरपंच यांनी आपण अतिक्रमण करणार्यांना फक्त नोटीस देवू शकतो याच्या पलीकडे काय करू शकतो असा सवाल केला.त्यामुळे अतिक्रमण करणारांचे मनोबल वाढत असून इमारत तयार झाल्यावर ती काढण्यासाठी अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतात.
याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावातील शासकीय मोकळ्या आणि बकळ जागा पुनर्वसन विभागाच्या ताब्यात आहेत त्या ग्रामपंचायती कडे वर्ग करण्यात आल्या नाहीत.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यकारिणी कडून अतिक्रमण करणार्याला नोटीस देण्या पेक्षा जास्तीची कारवाई करणे शक्य नसल्याचे सांगितले.तसेच याविषयी पुनर्वसन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.