भिगवण वार्ताहर . दि. ०९
भिगवण ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत हर्षवर्धन पाटील समर्थक तानाजी अनिल वायसे व उपसरपंचपदी शितल बाबासाहेब शिंदे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी महानवर यांनी जाहीर केले.
भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये हर्षवर्धन पाटील समर्थक दिवंगत नेते रमेश जाधव प्रेरीत श्रीनाथ ग्रामविकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनलला धूळ चारत सतरा पैकी सोळा जागांवर विजय मिळवत, भिगवण ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व स्थापन केले. (दि ०९) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील तानाजी वायसे व शितल शिंदे यांच्या निवडीमुळे भिगवणकरांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पॅनल प्रमुख पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, गटनेते संपत बंडगर, तुकाराम भरणे, अशोक शिंदे, , अशोक रायसोनी, अजित क्षीरसागर, अभिमन्यू खटके, गुलामभाई शेख, जावेद शेख, खंडेराव गाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी महानवर, सहाय्यक निवडणूक अधिकारी डि.ए गाडेकर व ग्रामविस्तार अधिकारी डि.बी. परदेशी यांनी काम पाहिले.
हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दिवंगत नेते रमेश जाधव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, सर्व पॅनेल प्रमुख व सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन, भिगवण गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे. पाणी, स्वच्छता व आरोग्य या गोष्टीना येणाऱ्या काळात प्राधान्य देण्यात येणार असून, भिगवणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच तानाजी वायसे यांनी सांगितले.