डेंग्यू आजाराने तक्रारवाडी गावच्या तरुणाचा मृत्यू

0
591

भिगवण वार्ताहर.दि.२९

तक्रारवाडी गावातील तरुण हॉटेल व्यावसायिक अमोल मोहन देसाई वय ३२ यांचे डेंगू सदृश आजाराने निधन झाल्याची घटना सोमवारी घडली.डेंगू आजाराने मृत्यू झाल्याने भिगवण परिसरात खळबळ माजली असून या आजाराची भीती नागरिकांत पसरली आहे.

कोरानाच्या आजाराने थैमान घातले असतानाच इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात डेंगू आजारानेही डोके वर काढल्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तर आरोग्य प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन कोरोनाच्या आजारात गुंतले असल्याचे सांगत इतर आजाराविषयी कोणतीही कार्यवाही करताना दिसून येत नाही. त्यामुळे भिगवण परिसरातील खासगी दवाखान्यात पुन्हा गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

तक्रारवाडी गावातील अमोल देसाई या तरुणाला गेल्या आठवड्यात ताप येत असल्यामुळे भिगवण येथील खासगी दवाखान्यात उपचार घेत पुढील उपचारासाठी बारामती येथील खासगी दवाखान्यात नेण्यात आले होते.तर पुढे त्याला पुणे येथील खासगी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले होते.मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्याने अखेरचा श्वास घेतला.धडधाकट आणि निरोगी असणाऱ्या अमोलला अचानक आलेल्या तापाने जीव गमवावा लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे.अमोलच्या पाठीमागे त्याची पत्नी आई आणि लहान मुली असा परिवार आहे.

अमोल याचा जीव वाचावा यासाठी तक्रारवाडी गावातील तरुणांनी एकत्र येत मदतीचा हात दिला. दवाखाना खर्चा साठी मदतीचे आवाहन करताच सर्वांनी पुढे येत आपल्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न केला .मात्र गावातील तरुणाच्या या मदतीला यश मिळाले नाही आणि अमोल मित्रांना सोडून देवा घरी गेला.

गावातील तरुणाचा मृत्यू होवूनही ग्रामपंचायत प्रशासन निवडणुकीच्या धामधुमीत मश्गुल असल्याने कोणत्याही प्रकारची फवारणी अथवा जनजागृती केली जात नाही.तसेच आरोग्य विभागही कोरोनाच्या नावाखाली इतर आजार पळून गेल्यासारखे वागत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here