
नवी दिल्ली, 6 मार्च : संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली आहे.
‘संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्र समोर आणणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याबाबतचा तपास सुरू आहे. हे एक संवेदनशील प्रकरण आहे,’ असं के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे.
दरम्यान, राफेल मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.